प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर लिखित आणि ५० वर्षांपूर्वी वादग्रस्त ठरलेलं ‘सखाराम बाईंडर’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर सादर होत आहे. यात अभिनेत्री नेहा जोशी लक्ष्मीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
नेहा म्हणाली की, “हे नाटक अर्धशतक जुनं असलं तरी त्याचा विषय आजही तितकाच लागू आहे. लक्ष्मीचं पात्र मला खूप भावलं. बाहेरून शांत दिसणारी पण आतून खंबीर अशी स्त्री ही व्यक्तिरेखा आहे. लग्नसंस्थेवर श्रद्धा ठेवणारी लक्ष्मी आणि त्याच्या पूर्ण विरोधात असलेल्या सखारामचं नातं रंगमंचावर प्रेक्षकांना पाहायला मिळेल.”
या नाटकाची निर्मिती सुमुख चित्र संस्थेने केली असून, निर्माते मनोहर जगताप आणि कार्यकारी निर्माते निखिल जाधव आहेत. दिग्दर्शन अभिजीत झुंजारराव यांनी केलं आहे. संहितेत कोणताही बदल न करता मूळ स्वरूप जपण्यात आलं आहे.
नेहाचं नाव अभिनेता सयाजी शिंदे यांच्यामुळे अंतिम झालं. त्यांच्या सोबत काम करण्याबद्दल नेहाने सांगितलं की, “सुरुवातीला थोडं दडपण होतं. पण ते जेव्हा रंगमंचावर उभे राहतात, तेव्हा फक्त एक कलाकार म्हणूनच समोर येतात. त्यांच्या अभिनयातील प्रामाणिकपणा आणि निष्ठा खूप शिकवून जातात.”
शेवटी नेहाने प्रेक्षकांना आवाहन केलं की, “काळ बदलला आहे, कलाकार बदलले आहेत. नाटक आवडलं किंवा नाही, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला सांगा. त्यातून आम्ही तेंडुलकरांच्या विचारांपर्यंत किती पोहोचू शकलो, हे समजेल.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
