मराठी चित्रपटसृष्टीसाठी सप्टेंबर महिना धकधक वाढवणारा ठरणार आहे. एका बाजूला प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार असली, तरी निर्माते आणि वितरकांसाठी ही वेळ कठीण परीक्षा घेणारी आहे.
१२ सप्टेंबरला एकाच दिवशी तब्बल ९ सिनेमे प्रदर्शित होत आहेत. त्यात तीन मराठी चित्रपट आहेत – दशावतार, आरपार आणि बिन लग्नाची गोष्ट. तर सोबतच सहा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. इथेच गोष्ट संपत नाही. १९ सप्टेंबरलाही १० नवे चित्रपट दाखल होत आहेत, ज्यात सहा मराठी आणि चार हिंदी चित्रपट आहेत. म्हणजेच केवळ दोन आठवड्यात प्रेक्षकांना १९ नव्या सिनेमांचा वर्षाव अनुभवायला मिळणार आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कलाकारांनी प्रमोशनसाठी मैदान गाजवलं आहे. मंडप, मिरवणुका, सोशल मीडियावरील गाणी, रील्स, ट्रेलर लाँच, राजकीय नेत्यांना भेटीगाठी – प्रत्येक सिनेमा आपला प्रेक्षकवर्ग खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसतोय. तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटांना लक्षात घेऊन प्रचार मोहीम आखली गेली आहे.
सिनेमांच्या या टकरीत प्रेक्षक नक्कीच भरभरून एन्जॉय करणार, मात्र निर्मात्यांना थिएटर स्क्रीनसाठी मोठी रस्सीखेच करावी लागणार आहे. प्राइम टाइम स्लॉट, पहिल्या आठवड्यातील प्रेक्षकसंख्या आणि बॉक्स ऑफिसवरचं टिकाव – यातून कोणता सिनेमा वरचढ ठरेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
चित्रपट वितरकांच्या मते, “हिंदी, दाक्षिणात्य सिनेमांचं वर्चस्व, ओटीटीचं आव्हान आणि प्रेक्षकांचा बदलता कल लक्षात घेतला, तर हे दोन आठवडे मराठी चित्रपटसृष्टीसाठी निर्णायक आहेत.” पुढील महिन्यांत विनोदी, साहित्यिक, कौटुंबिक, सामाजिक अशा सगळ्या धाटणींचे सिनेमे प्रेक्षकांना मिळणार आहेत. पण मोठ्या सिनेमांच्या एकाच वेळी होणाऱ्या टकरीमुळे प्रदर्शनाचं नियोजन करणं ही खरी गरज आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
