Marathi Films: मराठी चित्रपट उद्योगासाठी महत्त्वाची बातमी आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी मोठी घोषणा करत सांगितले की, ५० मराठी चित्रपटांना १४ कोटी ६२ लाखांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे. सामाजिक आशय, कलात्मक दर्जा आणि प्रयोगशीलतेमुळे निवडलेल्या या चित्रपटांना आर्थिक मदत मिळणार आहे.
मुंबईतील प्रभादेवी येथे रविंद्र नाट्यमंदिरात झालेल्या कार्यक्रमात हा निर्णय जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने या सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार उपस्थित होते.
या कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे पोस्टरही अनावरण करण्यात आले. शेलार यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील संत-महात्म्यांचे कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करत आहे.
चित्रपट हा फक्त मनोरंजन नसून समाजाशी संवाद साधणारे माध्यम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्त्री-समानता, पर्यावरण, ग्रामीण जीवन यांसारख्या अनेक विषयांवर मराठी चित्रपटांनी समाजात जनजागृती केली असल्याचे ते म्हणाले.
याच कार्यक्रमात आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली. फिल्म सिटीचा अंतिम आराखडा मंजूर झाल्याचे शेलार यांनी सांगितले. महाराष्ट्रातच अत्याधुनिक ऑडिओ-व्हिज्युअल गेमिंग सेंटर उभारण्याचाही त्यांचा मानस आहे.
या अर्थसहाय्य योजनेत राष्ट्रीय पुरस्कार विजेते, राज्य पुरस्कारप्राप्त तसेच ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ दर्जाचे चित्रपटांचा समावेश आहे. मूल्यांकन प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली असून परीक्षक समितीचेही शेलार यांनी आभार मानले.
या सर्व उपक्रमांमुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा आधार मिळणार असून उद्योगाला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
