Last Stop Khanda Movie: सध्या चर्चेत असलेला ‘लास्ट स्टॉप खांदा’ हा चित्रपट प्रेम, भावना आणि हास्याचा सुंदर संगम घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. २१ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ ही एक अशी कथा आहे, जिथे प्रेमाचा प्रवास हसत-खेळत आणि कधी कधी डोळे पाणावणारा ठरतो. एका तरुणाचं लहानपणापासून एका मुलीवर असलेलं प्रेम हे कथानकाचं केंद्र आहे. पण त्याचं प्रेम अपूर्ण राहतं. वर्षांनंतर त्या मुलीचं ब्रेकअप झाल्यावर, तो पुन्हा तिच्या आयुष्यात आपली जागा मिळवण्याचा प्रयत्न करतो. हे प्रयत्न यशस्वी ठरतात की नाही, याचा उलगडा या चित्रपटात होतो.
या चित्रपटात श्रमेश बेटकर आणि जुईली टेमकर मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश कापरेकर, प्रियांका हांडे आणि इतर कलाकार झळकणार आहेत. तसेच प्रभाकर मोरे, धनश्री काडगावकर आणि अशोक ढगे हे पाहुणे कलाकार म्हणून दिसणार आहेत.
ट्रेलरमध्ये चित्रपटाची हलकीफुलकी आणि भावनिक कथा, तसेच विनोदी संवाद स्पष्टपणे जाणवतात. विशेष म्हणजे ‘शालू झोका दे गो मैना’ हे गाणं आणि टायटल साँग आधीच प्रेक्षकांच्या ओठांवर आलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘शिवम फिल्म क्रिएशन सिग्नेचर ट्यून्स’ आणि ‘स्नेहा प्रॉडक्शन्स’ या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. प्रदीप मनोहर जाधव निर्माते असून, सचिन कदम आणि अमृता सचिन जाधव सहनिर्माते आहेत. लेखन श्रमेश बेटकर यांनी केलं असून, दिग्दर्शन विनित परुळेकर यांनी केलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही शो आणि ओटीटीवरील नवीन अपडेट्स, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. वेगवान, स्पष्ट आणि फॅक्ट-बेस्ड रिपोर्टिंग करणं हे माझं वैशिष्ट्य आहे.
