शाळांमध्ये सिनेमा दाखवता येणार नाही; क्रांतिज्योती विद्यालय टीमचा खुलासा

Krantijyoti Vidyalaya Movie: मराठी शाळांची संख्या कमी होत चालली आहे, हे वास्तव ‘क्रांतिज्योती विद्यालय’ या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. दिग्दर्शक-लेखक हेमंत ढोमे यांनी इंग्रजी शिक्षणाच्या झगमगाटात आपली मायबोली आणि मराठी शाळा कशा दुर्लक्षित होत आहेत, याचं हृदयस्पर्शी चित्रण केलं आहे.

सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग आणि प्राजक्ता कोळी यांच्या दमदार अभिनयामुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनाला भिडतो आहे. अवघ्या दोन कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून मुंबई, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक शो हाऊसफुल्ल जात आहेत.

चित्रपटाची लोकप्रियता पाहून राज्यभरातील अनेक शाळांनी हा सिनेमा विद्यार्थ्यांना शाळेतच दाखवण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र याबाबत आता चित्रपटाच्या टीमकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

क्रांतिज्योती विद्यालय टीमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्पष्ट केलं आहे की, काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबींमुळे सध्या शाळांमध्ये चित्रपट दाखवणं शक्य नाही. टीमने सांगितलं की, चालू चित्रपटगृहातील सिनेमा शाळेत अवैध मार्गाने दाखवणं हा कायदेशीर गुन्हा ठरू शकतो. त्यामुळे शाळांनी अशा प्रकारचे प्रयत्न टाळावेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

मात्र टीमने एक दिलासादायक पर्यायही सुचवला आहे. ज्या भागांमध्ये चित्रपटगृह उपलब्ध नाहीत, तिथे फिरतं चित्रपटगृह सुरू करण्याची संकल्पना असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. यासाठी थोडा वेळ लागेल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, शाळांनी जवळच्या चित्रपटगृहात शो आयोजित करायचा असल्यास टीमकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असं आश्वासन देण्यात आलं आहे.

‘क्रांतिज्योती विद्यालय’ला मिळणारा प्रतिसाद केवळ चित्रपटापुरता मर्यादित राहिलेला नाही. मराठी शाळांच्या भवितव्याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून हा सिनेमा एक चळवळ बनत असल्याचं चित्र दिसत आहे. प्रेक्षक आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत, ढासळणाऱ्या शिक्षण व्यवस्थेकडे गांभीर्याने पाहू लागले आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

WhatsApp Channel Join Now

WhatsApp Group Join Now

Rang Marathi Telegram Group Join Now

Instagram Group Join Now

Leave a Comment


You cannot copy content of this page