Gondhal Movie: मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. गोंधळ या मराठी चित्रपटाने 56 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये पहिल्यांदाच सर्वोत्तम दिग्दर्शकाचा सन्मान पटकावला आहे. गेल्या 56 वर्षांत मराठी चित्रपटाला हा पुरस्कार मिळालेला नव्हता, त्यामुळे ही कामगिरी ऐतिहासिक मानली जाते.
गोव्यात झालेल्या या सोहळ्यात सिल्व्हर पिकॅाक इंटरनॅशनल सेक्शन अंतर्गत दिग्दर्शक संतोष डावखर यांना हा पुरस्कार देण्यात आला. यंदाच्या फेस्टिव्हलसाठी तब्बल 1130 चित्रपटांची नोंदणी झाली होती. त्यापैकी 570 फिचर फिल्म्स होत्या आणि त्यातून ‘गोंधळ’ची निवड झाली. या पुरस्कारामध्ये मानांकन आणि पंधरा लाखांची रोख रक्कम देण्यात आली.
कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, रजनीकांत, रणबीर सिंह, नवाजुद्दीन सिद्दीकी, डॉ. एल. मुरुगन, अश्विनी वैष्णव यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते. या आधी 2019 मध्ये ‘जल्लीकट्टू’चे दिग्दर्शक लिजो जोस यांना हा पुरस्कार मिळाला होता.
गोंधळ हा संतोष डावखर यांचा दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट आहे. हा चित्रपट नवरा–नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजरा होणाऱ्या गोंधळ या परंपरेच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. श्रद्धा, अंधश्रद्धा, कुटुंबातील नाती, भावनिक संघर्ष आणि बदलणारे सामाजिक दृष्टिकोन यांचा वेध घेणारी ही कथा प्रेक्षकांना जोडून ठेवते. प्रभावी सिनेमॅटोग्राफी आणि तांत्रिक मांडणीमुळे हा चित्रपट विशेष ठरतो.
पुरस्कारानंतर भावना व्यक्त करताना दावखर म्हणाले की, हा सन्मान संपूर्ण टीमच्या मेहनतीचा गौरव आहे आणि मराठी संस्कृतीला जागतिक स्तरावर मिळालेलं हे मोठं यश आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
