Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी 6’ च्या घरात अनुश्री माने आणि रुचिता जामदार यांनी राकेश बापटवर केलेल्या आरोपांमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेनंतर राकेश खूप दुखावला गेला. घरातील अनेक सदस्यांनीही अनुश्रीची कानउघडणी केली. या प्रकरणावर रितेश देशमुख काय बोलणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, अनेक कलाकार आणि चाहत्यांनी राकेशला पाठिंबा दिला आहे.
सोनाली पाटील आणि नेहा शितोळे यांनी राकेशसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. आता याच पाठोपाठ राकेशच्या बहिणीनेही त्याच्या बाजूने उघडपणे मत मांडलं आहे.
राकेशची बहीण शीतल बापट हिने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिलं आहे की, ‘वुमन कार्ड’चा गैरवापर ही पहिली वेळ नाही. अनेक महिला याचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात. त्यामुळे ज्या महिलांना खरंच मदतीची गरज असते, त्यांना योग्य वेळी मदत मिळत नाही. यामुळे समाजात महिलांबद्दल चुकीची धारणा तयार होते.
ती पुढे म्हणाली की, स्ट्राँग आणि स्वावलंबी महिला कधीच अशा पद्धतीने वागत नाहीत. “माझा भाऊ राकेश बापटवर माझा पूर्ण विश्वास आहे. तो कधीही चुकीचं वागणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे,” असं तिने म्हटलं. गेल्या दोन दिवसांत राकेशला जो पाठिंबा मिळाला, तो पाहून आनंद झाल्याचंही तिने सांगितलं.
दरम्यान, घरात नेमकं काय घडलं होतं, तेही समोर आलं आहे. अनुश्री माने राकेशच्या बेडवर झोपली होती. त्या वेळी राकेशची तब्येतही ठीक नव्हती. त्यामुळे त्याने इतर महिला सदस्यांना तिला उठवून दुसरीकडे झोपायला सांगण्याची विनंती केली. अनेकांनी प्रयत्न केला, पण अनुश्री उठली नाही. शेवटी कंटाळून राकेशने तिचा हात धरून तिला उठवलं, मात्र ती हलली नाही.
पुढच्या दिवशी अनुश्रीने हा प्रकार रुचिताला सांगितला. त्यानंतर रुचिताने हा मुद्दा मोठा केला. ती राकेशला म्हणाली की परवानगीशिवाय कुणालाही हात लावू नये, हे कळत नाही का.
या वादात अनुश्री म्हणाली होती, “माझा कोणी भाऊ इथे नाही. मला माझ्या परवानगीशिवाय कुणीच हात लावू शकत नाही. हा माझा मुद्दा आहे.”
या सगळ्यामुळे राकेश खूप दुखावला गेला. त्याने स्पष्ट केलं की त्याचा हेतू अजिबात चुकीचा नव्हता. तन्वी, दीपाली आणि प्राजक्ता यांनीही राकेशची बाजू घेतली. तन्वी म्हणाली, “राकेश दादा जेंटलमन आहे. तिने उठवण्यासाठी त्याने मलाच बोलावलं होतं.” सागर कारंडेनेही अनुश्रीची कानउघडणी केली.
सध्या चाहत्यांसह अनेक कलाकार या संपूर्ण प्रकरणात राकेश बापटला पाठिंबा देताना दिसत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
