बिग बॉस 19 चा ग्रँड प्रीमियर सुरू होताच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. या वेळी खास धक्का बसवणारा क्षण म्हणजे मराठी स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेची एन्ट्री. तो घरात 11वा स्पर्धक म्हणून दाखल झाला असून आता बिग बॉसच्या हिंदी घरात मराठी आवाजही ऐकायला मिळणार आहे.
स्टेजवर प्रणित येताच सलमान खानने थेट मराठीत संवाद साधून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. दोघांमध्ये मजेशीर संवाद रंगला. प्रणितच्या एका विनोदी उत्तरावर तर सलमानलाही हसू आवरलं नाही. या क्षणानंतर प्रेक्षकांच्या नजरा थेट प्रणितकडे वळल्या.
प्रणित मोरे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे. इंस्टाग्रामवर त्याचे साडेचार लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत, तर युट्यूबवर त्याच्या चॅनलला 10 लाखांपेक्षा जास्त सबस्क्राइबर्स आहेत. त्याचे व्हिडिओ नेहमी चर्चेत असतात आणि त्याच्या भन्नाट टायमिंगमुळे तो तरुणांमध्ये हिट झाला आहे.
पण त्याच्या कारकिर्दीत वादही कमी नाहीत. काही काळापूर्वी त्याने अभिनेता वीर पहाडियावर केलेल्या विनोदांमुळे त्याला मारहाण सहन करावी लागली होती. नंतर वीरने या प्रकरणाशी आपला काही संबंध नसल्याचे सांगत त्याच्याकडे माफी मागितली होती. या घटनेनंतर प्रणित अधिक चर्चेत आला होता.
आता बिग बॉस 19 मध्ये त्याची धमाल पाहायला मिळणार आहे. लोकशाहीच्या धर्तीवर चालणाऱ्या या सीझनमध्ये स्पर्धकच सगळे निर्णय घेणार आहेत. त्यामुळे प्रणितचा विनोदी अंदाज घरातल्या नाट्याला आणखी रंगतदार करेल, यात शंका नाही.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
