रॅपर आणि गायक बादशाह सध्या मोठ्या वादात अडकला आहे. त्याच्या ‘टटीरी’ या गाण्यावरून सुरू झालेला वाद आता आणखी वाढताना दिसत आहे. या प्रकरणात हरियाणा राज्य महिला आयोगाने कडक भूमिका घेतली असून बादशाहला अटक करण्याची मागणी केली आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रेणू भाटिया यांनी पानिपत आणि पंचकुला पोलिसांना याबाबत सूचना दिल्याचे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, या वादाच्या पार्श्वभूमीवर बादशाहला भारतात कुठेही कार्यक्रम किंवा कॉन्सर्ट करण्याची परवानगी देऊ नये. संबंधित ठिकाणी यासाठी नोटिसही पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
याचबरोबर बादशाह देशाबाहेर जाऊ नये, म्हणून त्याचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणीही आयोगाने केली आहे. या प्रकरणात पुढील कारवाई करण्यासाठी पोलिसांशी संपर्क सुरू असल्याचेही आयोगाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, महिला आयोगाने या प्रकरणात बादशाहला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देत समन्स पाठवले होते. मात्र, तो आयोगासमोर उपस्थित राहिला नाही. त्याऐवजी त्याचे वकील हजर झाले आणि कामामुळे बादशाह येऊ शकत नसल्याचे सांगत अधिक वेळ मागितला.
आयोगाने दुपारी तीन वाजेपर्यंतची मुदत दिली होती. तरीही बादशाह उपस्थित राहिला नाही. त्यामुळे आयोगाने नाराजी व्यक्त केली असून त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
महिला आयोगाच्या म्हणण्यानुसार, ‘टटीरी’ गाण्यातील काही शब्द आणि दृश्यांमुळे महिलांबाबत चुकीचा संदेश जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच कारणामुळे ६ मार्च रोजी बादशाहला नोटीस पाठवण्यात आली होती. त्याला पानिपतच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.
या वादानंतर पंचकुला पोलिसांनीही कारवाई केली आहे. १ मार्च २०२६ रोजी यूट्यूबवर रिलीज झालेलं हे गाणं हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गाणं प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक सामाजिक आणि महिला संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला होता.
या वादावर प्रतिक्रिया देताना बादशाहने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात तो म्हणाला, “माझ्या ‘टटीरी’ गाण्यातील काही शब्दांमुळे हरियाणातील काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर मला त्याबद्दल वाईट वाटतं. मी स्वतः हरियाणाचा असल्यामुळे मला माफ करावं.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
