महिलांच्या सहलींसाठी ओळखला जाणारा झिम्मा 3 आता पुरुषांच्या टोळीच्या सहलीत उतरणार आहे. यावेळचा प्रवास महिलांचा नाही, तर पुरुषांचा. आणि गंतव्य आहे श्रीलंका.
चित्रपटाचा धमाल टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘सहलीला जायचं, जायचं सहलीला’ म्हणत पुरुषांची ही भन्नाट टोळी श्रीलंकेच्या सफरीवर निघाली आहे. एका अर्थी ही बॉयज ट्रिप असल्याचे टीझरमधूनच जाणवते.
विशेष म्हणजे दिग्दर्शक हेमंत ढोमे यावेळी फक्त लेखन आणि दिग्दर्शन करणार नाहीत, तर स्वतः अभिनयातही सहभागी होणार आहेत.
सिद्धार्थ चांदेकर, हेमंत ढोमे, राजन भिसे, उदय सबनीस, सुयोग गोऱ्हे, अर्चित देवधर, सिद्धेश धुरी आणि अमेय वाघ अशी तगडी फळी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
टीझरमध्ये या सहलीची रंगतदार झलक दिसते. कोणी उत्साही, कोणी गंभीर, तर कोणी मिश्कील. वय, स्वभाव, विचार आणि जगण्याची पद्धत सगळ्यांची वेगळी.
आधी ‘झिम्मा’ आणि ‘झिम्मा 2’मध्ये महिलांच्या सहलीतील मैत्री, नाती आणि धमाल पाहायला मिळाली होती. यावेळी मात्र पुरुषांच्या मैत्रीवर आणि त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांवर भर आहे.
हेमंत ढोमे यांनी ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’चेही भव्य यश मिळवले आहे. इरादा स्टुडिओज प्रस्तुत आणि चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटात श्रीलंकेची निसर्गरम्य लोकेशन्स पाहायला मिळणार आहेत.
दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ‘झिम्मा’ आणि ‘झिम्मा 2’ला मिळालेल्या प्रेमामुळे तिसऱ्या भागासाठी काहीतरी वेगळं करायचं होतं. महिलांच्या सहलीनंतर यावेळी पुरुषांच्या सहलीतून त्यांच्या स्वभावातील वेगळेपण आणि धमाल दाखवली आहे.
पाच वर्षांनी पुन्हा अभिनय करण्याची संधी मिळाल्याने हा अनुभव त्यांच्यासाठी खास आहे, असे ते सांगतात. पण हा सिनेमा फक्त तिचा किंवा त्याचा न राहता सगळ्यांचा होतो, असे त्यांचे म्हणणे आहे.
हा चित्रपट येत्या 1 जानेवारी 2027 रोजी नववर्षाच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
