Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी ६ मध्ये अभिनेत्री दीपाली सय्यदने दणक्यात एंट्री घेतली आहे. पहिल्याच दिवशी घरात पाऊल ठेवताच ती चर्चेचा विषय ठरली. आता ती घरात कसा खेळ खेळणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाने ओळख निर्माण करणारी दीपाली सय्यद सोशल मीडियावरही सक्रिय असते. अभिनयासोबतच ती राजकारणातही सक्रिय आहे. मात्र BBM6 मध्ये एंट्री घेतल्यानंतर तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
दीपालीचा जन्म मराठी कुटुंबात झाला. तिचं मूळ नाव दीपाली भोसले होतं. 2008 साली तिने दिग्दर्शक बॉबी खान यांच्याशी लग्न केलं आणि आयुष्याची नवी सुरुवात केली. लग्नानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारल्याची चर्चा रंगली. त्यानंतर तिचं नाव सोफिया जहांगीर सैय्यद ठेवण्यात आल्याचं सांगितलं जातं.
लग्नानंतर तिने सोशल मीडियावर आपलं नाव दीपाली सय्यद असं केलं. यावरून तिला बरीच टीका सहन करावी लागली. काही काळानंतर तिने नाव बदलून दीपाली भोसले सय्यद केलं. तरीही नाव आणि आडनावावरून होणारी चर्चा थांबली नाही.
या टीकेबद्दल बोलताना दीपालीने एकदा स्पष्ट केलं होतं की, “माझ्या आडनावावरून अनेक गोष्टी बोलल्या जातात. माझे संस्कार, कुटुंब यावर प्रश्न उपस्थित होतात. पण मी याला फारसं महत्त्व देत नाही.”
लग्नानंतर तिने काही काळ चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र अभिनयावरचं तिचं प्रेम कायम राहिलं. त्यामुळे ती वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये आणि रिअॅलिटी शोमध्ये दिसत राहिली.
दीपालीने करायला गेलो एक, लाडी गोडी, होऊन जाऊ दे, मला एक चान्स हवा, ढोलकीच्या तालावर, वेलकम टू जंगल, उचला रे उचला आणि मुंबईचा डब्बेवाला अशा अनेक चित्रपटांत काम केलं आहे. आता BBM6 च्या निमित्ताने ती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी मनोरंजन क्षेत्रातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या घडामोडींवर खास लेखन करते. अचूक माहिती आणि वाचकांना समजेल अशा सरळ शैलीत रिपोर्टिंग करणं हे माझं प्राधान्य आहे.
