Dashavatar Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस अभिमानाचा ठरला आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या प्रमुख भूमिकेतील ‘दशावतार’ हा चित्रपट थेट ऑस्कर 2026 च्या मुख्य स्पर्धेत दाखल झाला आहे. सुबोध खानोलकर दिग्दर्शित या चित्रपटाला 98 व्या ऑस्कर पुरस्कारांच्या कंटेंशन लिस्टमध्ये स्थान मिळालं आहे.
यासह ऑस्करच्या मुख्य शर्यतीत पोहोचणारा ‘दशावतार’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे, भारत सरकारकडून अधिकृत एन्ट्री नसतानाही या चित्रपटानं स्वतःच्या जोरावर ही मजल मारली आहे. यंदा नीरज घेवान यांचा ‘होमबाउंड’ हा भारताचा अधिकृत चित्रपट आहे.
‘दशावतार’च्या निर्मात्यांनी हा सिनेमा ऑस्करच्या ओपन जनरल कॅटेगरीसाठी स्वतंत्रपणे पाठवला होता. जगभरातून आलेल्या हजारो चित्रपटांमधून निवडल्या जाणाऱ्या 150 ते 250 सिनेमांच्या यादीत या मराठी चित्रपटानं आपलं स्थान पक्कं केलं आहे.
या शर्यतीत ‘होमबाउंड’सोबतच ‘सीस्टर मीडनाइट’, ‘तन्वी द ग्रेट’, ‘टुरिस्ट फॅमिली’ आणि ‘कांतारा चॅप्टर 1’ हे भारतीय चित्रपटही स्पर्धेत आहेत.
‘दशावतार’ चित्रपट कोकणातील पारंपरिक दशावतार लोककला, तिथली संस्कृती आणि अवैध उत्खननामुळे होणाऱ्या पर्यावरणीय नुकसानावर भाष्य करतो. सामाजिक विषय मांडतानाच चित्रपटाची मांडणी प्रभावी आहे.
या सिनेमाची मोठी ताकद म्हणजे दिलीप प्रभावळकर यांची भूमिका. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी ‘बाबुली मेस्त्री’ ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबत महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन आणि प्रियदर्शिनी इंदलकर हे कलाकारही दिसतात.
2 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी केली. 28 कोटींहून अधिक कमाई करत तो 2025 मधील यशस्वी मराठी चित्रपटांपैकी एक ठरला.
दरम्यान, दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत हा क्षण संपूर्ण मराठी भाषेसाठी गौरवाचा असल्याचं म्हटलं आहे. झी स्टुडिओज आणि ओशन फिल्म कंपनीनंही या यशाला जागतिक पातळीवरील मान्यता असं संबोधलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील ताज्या बातम्या, ट्रेंड्स आणि अपडेट्स वाचकांपर्यंत जलदगतीने पोहोचवतो. सत्य माहिती आणि सोप्या भाषेत रिपोर्टिंग करणं ही माझी ओळख आहे.
