Kamali Tops TRP Charts: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ नव्या वर्षात प्रेक्षकांची पहिली पसंती ठरली आहे. अल्पावधीतच या मालिकेनं मोठं यश मिळवलं असून TRP यादीत अव्वल स्थान पटकावलं आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मिळालेलं हे यश ‘कमळी’ टीमसाठी खास मानलं जात आहे.
झी मराठीने सोशल मीडियावर अधिकृत पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. २०२६ मध्ये ‘कमळी’ने ४.२ TRP मिळवत वाहिनीवरील नंबर वन मालिका होण्याचा मान मिळवला आहे. एवढंच नाही तर ही मालिका रात्री ९ वाजताची स्लॉट लीडर देखील ठरली आहे.
पोस्टमध्ये झी मराठीने ‘कमळी’ टीमचं कौतुक करत नव्या वर्षाची सुरुवात दमदार झाल्याचं म्हटलं आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मालिकेचा TRP सातत्यानं वाढत होता. मात्र, स्लॉट लीडर होण्याची प्रतीक्षा प्रेक्षक करत होते. अखेर या आठवड्यात ‘कमळी’ने हे स्थान मिळवलं आहे.
९ वाजताच्या स्लॉटमध्ये ‘स्टार प्रवाह’वरील ‘नशीबवान’ आणि ‘कमळी’ यांच्यात चुरस पाहायला मिळत होती. या स्पर्धेत ‘कमळी’नं आघाडी घेतल्यामुळे चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. नंबर वन मालिका आणि स्लॉट लीडर असं दुहेरी यश मिळाल्यानं सोशल मीडियावरही उत्साहाचं वातावरण आहे.
झी मराठीच्या पोस्टखाली अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “सगळीकडे कमळीचीच हवा”, “टीमला खूप खूप अभिनंदन”, “आता TRP अजून वाढणार” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
मालिकेच्या कथेबद्दल बोलायचं झालं, तर सध्या अन्नपूर्णा तिच्या मोठ्या नातीचा शोध घेत असल्याचं दाखवलं जात आहे. राजनलाही आपल्या पत्नीला आणि लेकीला भेटायची ओढ आहे. पुढील भागांमध्ये कथानकाला नवं वळण मिळणार असल्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. कमळीच अन्नपूर्णाची नात आहे, हे सत्य कधी समोर येणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
मी मराठी चित्रपट, टीव्ही सिरीयल्स आणि ओटीटीवरील ट्रेंडिंग अपडेट्स आणि मनोरंजन बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवते. विश्वासार्ह माहिती आणि सोप्या भाषेतील प्रेझेंटेशन हे माझ्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.
