Priya Marathe: मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी कर्करोगाशी झुंज देत त्यांनी आज (रविवार) पहाटे अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून त्या लाइमलाइटपासून दूर होत्या. त्यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.
प्रिया यांनी शेवटचे काम ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत केले होते. मात्र, तब्येतीमुळे त्यांना ही मालिका अर्धवट सोडावी लागली होती. त्यावेळी त्यांनी चाहत्यांना एका व्हिडिओद्वारे सांगितले होते की, अचानक तब्येत खालावल्याने शूटिंग आणि आरोग्य यांचा समतोल साधणे कठीण झाले आहे. त्यामुळे ‘मोनिका’ ही भूमिका अपूर्ण ठेवून त्यांना मागे हटावे लागले.
अभिनय कारकिर्दीची सुरुवात त्यांनी ‘या सुखांनो या’ या मालिकेतून केली होती. नंतर ‘चार दिवस सासूचे’ मध्ये त्यांची भूमिका गाजली. हिंदी टेलिव्हिजनमध्ये ‘कसम से’ मालिकेतून त्यांनी पाऊल ठेवले. पण खरी लोकप्रियता त्यांना ‘पवित्र रिश्ता’मधील वर्षा आणि ‘बडे अच्छे लगते है’मधील ज्योती मल्होत्रा या भूमिकांमुळे मिळाली.
वैयक्तिक आयुष्यात प्रिया यांनी 24 एप्रिल 2012 रोजी अभिनेता शंतनु मोघे यांच्याशी विवाह केला. शंतनु यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. या दोघांना एक सुंदर मराठी सेलिब्रिटी कपल म्हणून ओळखलं जात होतं.
प्रिया मराठे यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठी आणि हिंदी कलाविश्वात शोककळा पसरली आहे. चाहते, सहकलाकार आणि जवळचे मित्र सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
