Better Half Chi Love Story Movie: मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका हटके घोस्ट कॉमेडीची जोरदार चर्चा सुरू आहे. सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू यांची तुफान जोडी असलेला ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’चा दमदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेम, भूत आणि हास्याचा अनोखा मेळ पाहून प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अजूनच उधाण आले आहे.
या आधीच ‘पालतू फालतू’ या खळखळून हसवणाऱ्या गाण्याने आणि ‘ना कळले कधी तुला’ या भावनिक गीताने चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण केलं होतं. आता ट्रेलरमधून प्रेक्षकांना एका भन्नाट गोंधळलेल्या प्रेमकथेची झलक मिळाली आहे.
कथा अशी की, सुबोध भावेची ‘बेटर-हाफ’ म्हणजेच पत्नी गेल्यानंतर तिचा आत्मा थेट त्याच्याच शरीरात वास करतो! मग सुरू होतो सुटकेसाठीचा हास्याने भरलेला संघर्ष, ज्यात प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव त्याला साथ देतात. पण शेवटी सुबोध भावाची यातून सुटका होते का? याचं उत्तर मिळणार २२ ऑगस्टला चित्रपटगृहात.
सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा प्रस्तुत, रजत मीडिया एंटरटेनमेंट निर्मित या सिनेमाचे लेखन, छायांकन आणि दिग्दर्शन संजय अमर यांनीच केलं आहे. संगीत साजन पटेल आणि अमेय नरे यांचं असून, कलाकारांची दमदार फौज—सुबोध भावे, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेहरे आणि अनिकेत विश्वासराव—या कथेला आणखी रंगत आणणार आहे.
दिग्दर्शक संजय अमर सांगतात, “ही फक्त घोस्ट कॉमेडी नाही, तर एक अनोखी प्रेमकथा आहे. कलाकारांच्या ताकदीमुळे हा विषय पडद्यावर तितक्याच प्रभावीपणे मांडता आला.”
मग तयार राहा—हा लव्ह ट्रँगल नाही, तर ‘घोस्ट ट्रँगल’ आहे! २२ ऑगस्टपासून ‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात गोंधळ घालणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मी मराठी चित्रपट, वेब सिरीयल्स आणि मनोरंजन जगतातील ताज्या बातम्या, रिव्ह्यू आणि ट्रेंडिंग अपडेट्स सोप्या भाषेत वाचकांसमोर मांडतो. नेहमी अचूक आणि विश्वासार्ह माहिती देणं हेच माझं प्राधान्य आहे.
