मराठी रंगभूमीवर एकेकाळी गाजलेलं आणि वादळ निर्माण करणारं विजय तेंडुलकर यांचं कालजयी नाटक ‘सखाराम बाइंडर’ पुन्हा रंगमंचावर येत आहे. १९७२ साली पहिल्यांदा सादर झालेलं हे वास्तववादी नाटक आजही तितकंच धारदार आणि प्रभावी वाटतं. स्त्री-पुरुष नात्यांवरचे कडवट वास्तव उघड करत समाजाला धक्का देणाऱ्या या नाटकाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता.
आता या नाटकाचा नवा अवतार प्रेक्षकांसमोर आणण्याची जबाबदारी स्वीकारली आहे, सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी. ते या नाटकात सखारामची भूमिका साकारणार आहेत. त्यांच्या वाढदिवशीच पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या नाटकाचं पोस्टर लोकार्पण करण्यात आलं. हे नाटक सुमुख चित्र आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् यांच्या सहकार्याने सादर होणार असून, या निर्मिती संस्थेचं हे तिसरं नाट्यपुष्प आहे.
सयाजी शिंदे म्हणाले, “हे नाटक माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे. आजच्या पिढीने हे पाहिलेलं नाही, त्यामुळे त्यांनाही या कलाकृतीचा गोडवा आणि धार अनुभवता यावा, हा आमचा प्रयत्न आहे.”
दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव म्हणाले, “अभिजात कलाकृती पुन्हा रंगमंचावर आणणं ही मोठी जबाबदारी आहे. विजय तेंडुलकरांच्या लेखनाची ताकद अबाधित ठेवत, आजच्या पिढीपर्यंत त्यांचा संदेश पोहोचवणं हाच आमचा उद्देश आहे.”
या नाटकात सयाजी शिंदे यांच्यासोबत नेहा जोशी, चरण जाधव, अनुष्का बोऱ्हाडे आणि अभिजीत झुंजारराव हे कलाकार झळकणार आहेत.
निर्माते – मनोहर जगताप, कार्यकारी निर्माते – निखिल जाधव, संगीत – आशुतोष वाघमारे, नेपथ्य – सुमीत पाटील, प्रकाशयोजना – श्याम चव्हाण, रंगभूषा – शरद सावंत, वेशभूषा – तृप्ती झुंजारराव, सहाय्यक – संकेत गुरव.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मी मराठी मनोरंजनविश्वातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. फॅक्ट-बेस्ड लेखन आणि अपडेटेड माहिती देणं हेच माझं ध्येय आहे.
