Tharla Tar Mag Serial: मराठी मालिकांमधून घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे ज्योती चांदेकर. ‘ठरलं तर मग’ मालिकेत तिने साकारलेली पूर्णा आज्जी प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली होती. दुर्दैवानं 16 ऑगस्ट रोजी 69 व्या वर्षी पुण्यात तिचं निधन झालं. काही दिवसांपूर्वीच तिनं मालिकेच्या महासंगम भागाचं शूटिंग केलं होतं आणि त्यानंतर ती अचानक आपल्यातून निघून गेली. या घटनेनं चाहत्यांना आणि मालिकेतील सहकलाकारांनाही मोठा धक्का बसला आहे.
ज्योती चांदेकर या तेजस्विनी पंडित आणि पौर्णिमा पंडित यांच्या आई. त्यांचा निरोप या दोघींसाठी मोठी पोकळी घेऊन आला. मात्र या दुःखात चाहत्यांनी व्यक्त केलेलं प्रेम लेकींना धीर देणारं ठरलं. पूर्णा आज्जीची जागा कुणीही घेऊ नये अशा असंख्य कमेंट्स सोशल मीडियावर दिसू लागल्या. “तिची भूमिका गावाला गेली असं दाखवा, पण दुसरी व्यक्ती नको,” असा प्रेक्षकांचा आग्रह होता.
या भावनिक प्रतिसादानं प्रभावित होऊन पौर्णिमा पंडितनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. तिनं आईच्या मालिकेतील छायाचित्रासोबत चाहत्यांच्या कमेंट्स शेअर करत लिहिलं –
“लहानपणीपासून समजलं होतं की आई वेगळी आहे. माझ्या आणि तेजूच्या आयुष्यात ती पुरेशी वेळ देऊ शकली नाही, कारण सतत नाटकं, दौरे, सिनेमा यात गुंतलेली असायची. पण त्या मागे प्रेक्षकांवरचं तिचं प्रेम आणि त्यांचं तिच्यावरचं वेडं प्रेम होतं. आई गेल्यावरच मला उमगलं की प्रेक्षकांचं नातं हे घरच्यांइतकंच घट्ट असतं.”
पौर्णिमा पुढे लिहिते, “आईला कुटुंबानं आधार दिला, पण चाहत्यांनी केलेला प्रेमाचा वर्षाव शब्दांत सांगता येणार नाही. ‘पूर्णा आज्जी’ला रिप्लेस करू नका अशा हजारो कमेंट्स वाचल्या, आणि तेव्हा कळलं की आईने खरंच काय कमावलं आहे. कलाकार हा आधी प्रेक्षकांचा असतो, मग घरच्यांचा. माझी आई – ज्योती चांदेकर – एक खऱ्या अर्थानं रंगकर्मी होती. संकटांतूनही ती थाटात जगली, नाती जोडली आणि प्रेम मिळवत राहिली.”
शेवटी पौर्णिमानं या दुःखाच्या काळात आधार देणाऱ्या सर्व नातेवाईक, मित्रपरिवार आणि चाहत्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी मनोरंजनविश्वातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. फॅक्ट-बेस्ड लेखन आणि अपडेटेड माहिती देणं हेच माझं ध्येय आहे.
