Nivedita Saraf: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ पुन्हा एकत्र येत आहेत. अनेक वर्षांनंतर ही जोडी छोट्या पडद्यावर दिसणार आहे. ‘अशोक मा.मा.’ या नव्या मालिकेतून दोघं पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर एकत्र काम करणार आहेत. या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसतेय.
या दोघांची जोडी मराठी सिनेमात नेहमीच लोकप्रिय राहिली आहे. त्यांच्या गोड केमिस्ट्रीने आणि अप्रतिम टायमिंगने अनेक चित्रपट गाजले. आता ही जादू पुन्हा घराघरांत झळकणार आहे.
मालिकेत निवेदिता सराफ एका उत्साही, आत्मनिर्भर आणि अविवाहित स्त्रीची भूमिका साकारणार आहेत. त्या ‘संस्कार वर्ग’ चालवतात, पण तो नेहमीच्या पद्धतीचा नसून दया, आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेवर आधारित आहे. कथा, कला आणि हास्याच्या माध्यमातून त्या मुलांना जीवनमूल्यं शिकवतात.
दरम्यान, अशोक मा.मा. आपल्या नातवंडांना या वर्गात घेऊन जातात. त्यांना वाटतं की वर्ग चालवणारी शिक्षिका पारंपरिक आणि शिस्तप्रिय असेल, पण समोर येते आधुनिक विचारांची स्त्री. तिच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे मामांचे ठाम विचार बदलायला लागतात. पुढे या दोघांमधील नातं कोणत्या वळणावर जाईल, हे मालिकेत उलगडणार आहे.
निवेदिता सराफ म्हणाल्या, “बऱ्याच वर्षांनी मला पुन्हा अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळतेय. प्रेक्षकांकडून नेहमीच विचारणा होत होती की आम्ही पुन्हा एकत्र कधी दिसणार. माझ्यासाठी ही खूप खास गोष्ट आहे. छोट्या पडद्यावर आमची जोडी पहिल्यांदाच दिसणार आहे आणि मला खात्री आहे की प्रेक्षकांनाही नक्की आवडेल.”
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Related Posts

मी मराठी मनोरंजनविश्वातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. फॅक्ट-बेस्ड लेखन आणि अपडेटेड माहिती देणं हेच माझं ध्येय आहे.
