Ajay Purkar: गेल्या काही दिवसांत मराठी टेलिव्हिजनवर नवीन मालिकांची मोठी लाट आली आहे. झी मराठीवर नुकत्याच तीन नव्या मालिकांनी एन्ट्री घेतली, तर स्टार प्रवाहवरदेखील अनेक शो सुरू झाले. आता या यादीत आणखी एक दमदार मालिका जोडली जाणार आहे.
स्टार प्रवाहच्या सोशल मीडियावर नुकताच एका नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आला. त्यात पाठमोऱ्या खलनायकाची झलक पाहायला मिळते. चाहत्यांनी अंदाज बांधायला सुरुवात केली आणि बऱ्याच जणांनी ‘हा अजय पुरकरच आहे’ असं म्हटलं. आणि हो – त्यांचा अंदाज बरोबर ठरला! तब्बल सहा वर्षांनंतर अजय पुरकर मालिकांच्या दुनियेत पुनरागमन करत आहेत.
‘नशिबवान’मधील अंगावर काटा आणणारी एन्ट्री
आगामी ‘नशिबवान’ या मालिकेत अजय पुरकर ‘नागेश्वर घोरपडे’ हा खलनायक साकारणार आहेत. पैशांच्या जोरावर लोकांना त्रास देणारा, कायद्याच्या पंजातून कायम सुटणारा आणि निर्दयी, धूर्त स्वभावाचा हा माणूस प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणार आहे.
“महेश कोठारे यांच्यासोबत काम करण्याचं माझं स्वप्न होतं आणि कोठारे व्हिजन्ससारख्या मोठ्या निर्मिती संस्थेसोबत ही भूमिका करणं माझ्यासाठी खास आहे. नागेश्वरच्या पात्रात अनेक कंगोरे आहेत आणि जवळपास सहा वर्षांनी मालिकेत परतताना मला अभिनेता म्हणून चांगलाच कस द्यावा लागेल,” असं अजय यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितलं.
चित्रपटांतला ‘खलनायक’ ते मालिकांमधला ‘नागेश्वर’
अजय पुरकर यांची फिल्मोग्राफी पाहिली तर ‘पावनखिंड’, ‘सुभेदार’, ‘फत्तेशिखस्त’, ‘शेर शिवराज’, ‘फर्जंद’ आणि नुकताच गाजलेला ‘मुंज्या’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांची दमदार कामगिरी प्रेक्षकांनी पाहिली आहे. आता मात्र ते छोट्या पडद्यावर एक नवीन, प्रभावशाली खलनायक घेऊन परतले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मी मराठी मनोरंजनविश्वातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. फॅक्ट-बेस्ड लेखन आणि अपडेटेड माहिती देणं हेच माझं ध्येय आहे.
