मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत गेली अनेक वर्षं आपल्या अभिनयाने छाप पाडणारे आणि ‘कवी सौमित्र’ म्हणून ओळखले जाणारे किशोर कदम सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अंधेरी, चकाला येथील त्यांचं राहतं घर धोक्यात आलं असून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांकडे थेट मदतीची मागणी केली आहे.
किशोर कदम यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करून आपली व्यथा मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या इमारतीच्या पुनर्विकास प्रक्रियेत बिल्डर आणि पीएमसीच्या संगनमताने फसवणूक झाली आहे. ते आणि इतर 23 रहिवासी आपली घराची सुरक्षितता गमावण्याच्या मार्गावर आहेत.
त्यांनी पोस्टमध्ये सांगितलं की, ते गेली तीन-चार दशके मराठी आणि हिंदी रंगभूमी तसेच सिनेमात काम करत आहेत. त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पुरस्कारही मिळाले आहेत. पण सध्या त्यांची सोसायटी, अंधेरीतील ‘हवा मेहेल’, प्राईम लोकेशन असूनही SRA/स्लम डेव्हलपमेंट प्रकल्पाखाली आणली गेली आहे. हे सर्व कमिटीच्या दिशाभूल करणाऱ्या निर्णयांमुळे आणि महत्वाची माहिती लपवून झाल्याचं ते म्हणाले.
त्यांच्या मते, सोसायटी कमिटी जर सदस्यांच्या हिताचं पाहत नसेल, बिल्डर आणि PMCच्या दबावाखाली काम करत असेल, तर सामान्य माणसाचं घर ट्रान्झिट कॅम्पसारखं होण्याची वेळ येते. बहुमताच्या नावाखाली चुकीचे निर्णय घेतले जातात आणि जे कायदेशीर प्रश्न विचारतात त्यांचा आवाज दाबला जातो.
किशोर कदम यांनी असा आरोप केला की, पुनर्विकासाच्या विरोधात आवाज उठवल्याने त्यांना सोसायटीतील इतर सदस्यांनी वाळीत टाकलं. त्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर काढलं, महत्वाची माहिती लपवली आणि चुकीचं चित्र रंगवलं की ते पुनर्विकासाच्या विरोधात आहेत. त्यांच्या मते, हीसुद्धा एका प्रकारची शहरी अन्यायाची घटना आहे ज्यासाठी कायद्यात स्पष्ट तरतूद नाही.
मुंबईसह अनेक ठिकाणी अशा केसेस वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात आणि सामान्य माणूस हतबल होतो. त्यांनी शासनाला या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती केली आहे. तसेच, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील आणि महाराष्ट्रातील जनतेला एका कलाकाराचं घर वाचवण्याचं आवाहन केलं आहे.
‘नटरंग’, ‘फॅन्ड्री’, ‘जोगवा’ आणि ‘जारण’सारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांना भुरळ घालणारे किशोर कदम हे एक उत्कृष्ट कवीसुद्धा आहेत. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आता मोठं संकट आलं आहे. सोसायटीच्या चुकीच्या निर्णयांमुळे त्यांचं राहतं घर धोक्यात आहे आणि त्यासाठी ते आता थेट जनतेसमोर मदतीची हाक देत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मी मराठी मनोरंजनविश्वातील नवीन चित्रपट, सिरीयल्स आणि ट्रेंडिंग बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवतो. फॅक्ट-बेस्ड लेखन आणि अपडेटेड माहिती देणं हेच माझं ध्येय आहे.
