गावरान बोलीभाषेतील शिव्यांचा खजाना घेऊन येतोय ‘बंदूक्या’

Posted on Aug 28 2017 - 8:45am by Reporter

‘बंदूक्या’ चित्रपटाचे एक पोस्टर.

आपल्या वेगळ्या शैलीने अन् थाटाने सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ‘बंदूक्या’ हा सध्याचा बहुचर्चित चित्रपट येत्या १ सप्टेंबर २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. ‘बंदूक्या’ हा सर्वच बाबतीत अव्वल ठरलेला चित्रपट आता महाराष्ट्राच्या चोखंदळ प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे.

खास ‘जुंदरी झटका’ म्हणून स्वतंत्र ओळख असणाऱ्या जुन्नरकडच्या निखळ-विनोदी तसेच रांगड्या असे विविध पैलू असलेल्या ‘अन-टच’ गावरान बोलीभाषेचा वापर प्रामुख्याने चित्रपटात झाल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणारा ठरणार आहे.

६ नामांकनं आणि त्यातून सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट, सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार पदार्पण या निवडक ४ खास पुरस्कारांचा आत्ताच पार पडलेल्या ५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मान मिळविला. या पुरस्कारांनी ‘बंदूक्या’ ची उंची आणखीनच उंचावली आहे. शिवराळ भाषेमुळे चर्चिला जाणारा ‘बंदूक्या’ हा एका विशिष्ट समाजात पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या आणि आजही अस्तित्वात असलेल्या एका विशिष्ट प्रथेवर भाष्य करणारा चित्रपट असल्याचे कळते.

राहुल मनोहर चौधरी या दिग्दर्शकाने सहज भूमिकेला शोभतील अशा काही खास कलाकारांची निवड केली आहे. निर्माते राजेंद्र बोरसे आणि प्रतिभा बोरसे यांच्या वर्षा सिने व्हिजनची निर्मिती असलेल्या ‘बंदूक्या’ मध्ये अभिनेत्री अतिशा नाईक, अभिनेता शशांक शेंडे, नामदेव मुरकुटे, निलेश बोरसे यांच्यासह अमोल बागुल, तन्मयी चव्हाणके, उन्नती शिखरे यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. निलेश बोरसे या अभिनेत्याचं चित्रपट क्षेत्रात प्रथम पदार्पण असल्याने मराठी सिनेसृष्टीला एक नवीन चेहरा मिळणार आहे.

गावरान बोलीभाषेमुळे या सिनेमाचा एक वेगळाच ठसका पोट धरून हसता हसता शेवटी अंतर्मुख करणारा आहे. अस्सल मनोरंजनाचा आस्वाद देता देता मधूनच चिमटा काढून जाणाऱ्या या चित्रपटाची गाणी अगदी अव्वल झाली आहेत. सध्या सर्वत्र वाजत-गाजत असलेलं ‘माझा ईर’ हे महाराष्ट्राचा लाडका गायक आदर्श शिंदेच्या रांगड्या आवाजातलं गाणं सहज आपल्या तालावर थिरकायला भाग पाडतं. ‘आता सोसना’ हे सिनेमातील अतिशय वेगळ्या धाटणीचं गाणं सुप्रसिद्ध गायक जावेद अली आणि गायिका महालक्ष्मी अय्यर यांच्या सुमधुर आवाजात सजलं आहे.