ग्रामीण भागातील शिक्षणाचे वास्तव दाखविणारा ‘घुमा’

Posted on Aug 27 2017 - 2:05pm by Reporter
ghuma

‘घुमा’ या चित्रपटाचे एक पोस्टर.

नागराज मंजुळे आणि भाऊराव कऱ्हाडे यांच्या नंतर, आता महेश रावसाहेब काळे हा तरुण एका भावपूर्ण ग्रामीण कथेवर ‘घुमा’ हा मराठी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये या चित्रपटाला ‘बेस्ट ऑडियन्स अवॉर्ड’ ने सम्मानित करण्यात आले तर महाराष्ट्र शासनाने ‘बेस्ट प्रोडक्शन वॅल्यु’ हा पुरस्कार प्रदान केला. आपल्या मुलीला इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या एका शेतकऱ्याची कथा मांडणारा ‘घुमा’ हा मराठी चित्रपट येत्या ६ ऑक्टोबर २०१७ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

महेशच्या ‘रुपया’ या शॉर्टफिल्मसाठी त्याला कोलकाता फिल्म फेस्टिवल मध्ये उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. नगरच्या ज्या संस्थेतून नागराज मंजुळे आणि भाऊराव कऱ्हाडे यांनी शिक्षण घेतले, त्याच संस्थेतून महेशने सुद्धा चित्रपट दिग्दर्शनाचे घडे घेतले आहेत. ‘घुमा’ हा चित्रपट सुरु करण्यापूर्वी महेशला या दोन दिग्दर्शकांनी मोलाचा सल्ला सुद्धा दिला होता.

“चित्रपटाची कथा तयार झाल्यानंतर मी माझे वडील रावसाहेब काळे यांना चित्रपट करायचा आहे असे सांगितले. त्यांनी मला निर्माता शोधण्याचा सल्ला दिला. मात्र खूप प्रयत्न करूनही जेंव्हा निर्माता मिळणे कठीण झाले, तेंव्हा वडिलांनी सुरुवातीचा खर्च करण्याचे धाडस दाखविले. जून २०१६ मध्ये चित्रपटाचे काम सुरु झाले आणि जे काही काम आम्ही तेवढ्या पैश्यात करू शकलो, ते पाहून मदन आव्हाड यांना विश्वास बसला कि मी चांगले काम करू शकतो, आणि त्यांनी ‘घुमा’ च्या निर्मात्याची जबाबदारी उचलली,” महेशने “रंगमराठी” ला सांगितले.

‘घुमा’ या चित्रपटात सर्व नवीन कलाकार असून त्यांची निवड महेशने औरंगाबाद आणि अहमदनगर येथे ऑडिशन आयोजिय करून केली. चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण नगरच्या ग्रामीण भागात २५ दिवसात करण्यात आले.

या चित्रपटात गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेली ३ गाणी असून त्याचे संगीत जसराज जोशी, ऋषिकेश दातार आणि सौरभ भालेराव यांनी केले आहे. या गाण्यांना अजय गोगावले, प्रिया बर्वे आणि मुग्धा हसबनीस यांचे स्वर लाभले असून त्याचे नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर यांनी केले आहे. “ढोलकीच्या तालावर” या प्रसिद्ध मालिकेची विजेती वैशाली जाधव हिने ‘घुमा’ या चित्रपटात एक लावणी सादर केली आहे. चित्रपटाचे छायाचित्रण योगेश कोळी यांनी केले असून संकलन अपूर्वा साठे यांनी केले आहे.