केदार शिंदेचा नवा मराठी चित्रपट ‘रायबाचा धडाका’

Posted on Aug 27 2017 - 1:49pm by Reporter

rayba dhadaka

दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या सोबत चित्रपटाचे निर्माते आणि इतर.

तेलंगणातील हैद्राबादस्थित तेलगू चित्रपटसृष्टीत अग्रगण्य असलेल्या ‘श्री विजयासाई प्रॉडक्शन’ ने आता मराठी चित्रपट सृष्टीत उडी घेतली असून त्यासाठी आघाडीचा दिग्दर्शक केदार शिंदे यांची निवड करून आजच्या तरुणाईला अपेक्षित चित्रनिर्मितीला प्रारंभ केला आहे. ‘रायबाचा धडाका’ असे नामकरण असलेल्या या हटके चित्रपटाचा कॅनव्हास लवासा, आळंदी, मुंबई, ठाणे, पुणे इत्यादी शहरांमध्ये फुलून आला आहे.

या चित्रपटातून आल्हाद अंडोरे आणि राधिका यांचे पदार्पण होत असून अत्यंत लोभस अशी ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील अप-कमिंग सुपरस्टार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या लुक बाबत कमालीची गुप्तता प्रॉडक्शनने बाळगल्याचे सांगण्यात येत आहे. सोबतच्या कलावंतांची नावेही सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून चित्रपटाच्या तांत्रिक कामकाज प्रक्रियेनंतर लवकरच त्यांचा खुलासा करण्यात येणार असल्याचे प्रॉडक्शनतर्फे सांगण्यात आले आहे.

हैद्राबाद येथील ‘श्री विजयासाई प्रॉडक्शन’ सिनेमा कंपनीची निर्मिती असल्यामुळे तेथील तेलगू सिनेमाच्या भव्य यशाचा नवा फॉर्मुला अजमावतानाच मराठी मातीतलं सत्व कुठे हरवू नये यासाठी विशेष दक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे. मराठी चित्रपटांचा इतिहास, प्रेक्षकांची आवड आणि स्पर्धा यांचा संग्रह करून त्यांनी आपलं असते कदम निर्मितीत टाकल्याचे बोलले जात आहे. यासाठी त्यांनी वंदेमातरम उर्फ सुरेश शिंदे यांचे योगदान घेतले असून त्यांच्या देखरेखीखाली या ही निर्मिती प्रक्रिया सुरु आहे.

रायबा आणि शुभ्रा यांच्या तलत प्रेमाची कथा या चित्रपटात रेखाटण्यात आली आहे. अत्यंत हलकीफुलकी मनोरंजनप्रधान कौटुंबिक अशी ही गोष्ट आहे. रायबा आणि शुभ्रा ही एक अत्यंत प्रफुल्लित आणि ताजी टवटवीत जोडी मन लुभावेल अशी आहे. चित्रपटाला फ्रेश लूक देण्यासाठी अत्यंत देखणी आणि ग्लॅमरस जोडीची निवड करून या निर्माता दिग्दर्शक मंडळींनी यशस्वी वाटचाल केली आहे.

डीओपी सुरेश देशमाने यांची सिनेमॅटोग्राफी आणि पंकज पडघम यांचे संगीत ही आणखी एक जमेची बाजू असून केदार शिंदेशाही तोड्याने नटलेली ही रोमँटिक लव्हस्टोरी पाहण्यासाठी प्रेक्षक नक्कीच उत्सुक असणार आहेत.